Menu

पूर्णब्रह्म-By Prasad deshpande

माझं एक निरीक्षण आहे, की उत्तर भारत (उत्तर प्रदेश आणि वरचा पट्टा) दक्षिण भारत (खालची ४ राज्ये) उत्तर गुजरात राजस्थान (पश्चिम भारत) आणि प.बंगाल, बिहार-झारखंड आणि पूर्वोत्तर हा (पूर्व भारत) हे पण जोडू शकता ह्या प्रांतातील लोक सहसा आपल्या खाण्याच्या आणि राहण्याच्या सवयी बदलायला उत्सुक नसतात. मी कोचीला होतो तेंव्हा माझा एक फ्लॅटमेट हिमाचलचा होता ३ वर्ष त्या पठ्ठयाने ऑफिसच्या IRCTC कँटीनची नॉर्थ इंडियन थाळी खाल्ली. अर्थात त्यात पांढरा भात आणि पाणीदार वरण सोडलं तर काहीच चव नॉर्थ इंडियन नसायची. त्याची ही अवस्था बघुन मी त्याला २-३ वेळा तुडकिया भात हिमाचली धाम,आणि पनीर बटर मसाला खाऊ घातलं होतं. ती चव ऑथेंटिक होती का माहिती नाही पण "भाई घर की याद दिला दी आपने, १०० जियो और मेरे फ्लॅटमेट कर के जियो" ही त्याची दाद बोलकी असायची. अशीच तत्सम दाद मला राजस्थानी फ्लॅटमेट कडुन शुद्ध तुपातल्या काजू-बदाम युक्त कणकेच्या शिऱ्या साठी आणि तेलुगू फ्लॅटमेट कडुन हैदराबादी दम बिर्याणीसाठी आली आहे. बरं त्या तेलुगू मित्राने तर एका ऑफिशियल अभिनंदन मेल मध्ये काय लिहावं की प्रसाद हा थंड डोक्याने काम करणारा उत्तम कन्सल्टंट तर आहेच पण त्याहुन उत्तम शेफ आणि हैदराबादी बिर्याणी स्पेशालिस्ट आहे!! सहसा मी प्रचंड खवय्या असल्यामुळे बाहेर खायचो तेंव्हा ह्या लोकांना त्यांच्या प्रांताच्या बाहेरील काही डिशेस ट्राय करायला घेऊन गेलो तर ते खुप सेन्सेटिव्हली रिऍक्ट व्हायचे. नाही म्हणजे नाही हा हेका असायचा. उपाशी राहतील, अगदी कडीपत्ता घातलेली दक्षिण भारतीय पद्धतीची पनीरची भाजी खातील पण अप्पम-कडला करी कडे ढुंकूनही बघणार नाही. अट्टाहास हा ते पदार्थ कसे असतील हा नाही, तर हे काय जेवण आहे?? असा असायचा.
Authentic केरळी घरची चव, कडंबरा हॉटेल कोच्ची (near Wonderland)

मी बेट द्वारका गुजरातच्या किनारपट्टीपासून तर पार चेन्नई रामेश्वरम पर्यंत समुद्र किनाऱ्यावर राहिलोय. मनसोक्त खादाडी केलीय, पण जेंव्हाही आलपुळा ला गेलोय आणि पनीर मागविले असेल किंवा कोकणात पावसला येऊन मस्त ओलं खोबरं घातलेले पोहे सोडून समोसे ऑर्डर केलं आहे असं खचितचं झालं असेल. अस्सल महाराष्ट्रीय घरच्या जेवणानंतर मला केळीच्या ताज्या हिरव्यागार पानावर पालक्कड माट्टा राईस सोबत सर्व्ह केलेला केरळी साध्या सगळ्यात प्रिय आहे. नारळाच्या तेलाची अप्रतिम चव, वेगवेगळ्या प्रकारचे अवियल, पचडी, किचडी, बिन्स किंवा कॅबेज थोरन, मंगा करी, पुळी इंजी, शर्करा उप्परी, सांबार, रस्सम, पुलुशेरी, उच्चीकारी, पापडम आणि चेरी ऑन द टॉप आडा किंवा पालडा पायसम!! स्वर्गातील मेनकाच डोक्यावर थुई थुई नाचत असते जणु. एकीकडे दीपिका पदुकोण आणि एकीकडे ओणम साध्या ठेवलं आणि कुणावर अधिक प्रेम करतोस असं विचारलं तर मी बिनदिक्कतपणे ओणम साध्या कडे बोट दाखवेन. (हा नजरिया आली तर मात्र जरा विचार करावा लागेल) कदाचित केरळला मी चार वर्ष राहिलोय, किंवा ह्या राज्यावर तिथल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम आहे म्हणुन असेल. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक ह्या राज्यात देखील केळीच्या पानावर तत्सम ह्याच प्रकारचं जेवलोय, पण साध्यातली मजा इकडे येत नाही. मदुराई, तिरुमल्ला, हैदराबाद, मैसुर, बंगळुरू ह्यांची स्वतःची अशी वैशिष्ट्य आहेत पण एक तृपतेची ढेकर जी सरळ तुमच्या आत्म्याच्या गाभ्यातून येते ती साध्या खाल्ल्यावरच येते बाकीच्या पोटातून येतात. ते आंध्रप्रदेशातील जळजळीत जेवण मात्र काही केल्या पचतच नाही.
आदासा (सावनेर) मंदिराबाहेरचा वैदर्भीय प्रकारचा झुणका भाकरी ठेचा आणि टोमॅटो चटणी
इकडे वाळवंटात तग धरून राहतोय त्याला कारण आहे, मल्याळी भाषा आणि तितकाच चविष्ट साध्या. साध्याची पण वैशिष्ट्य असतात म्हणजे तुम्हाला सांबारमध्ये चिंचेचा अर्क थोडा ठसका लागण्याइतपत असेल तर कोल्लम कडचा सांबार असतो,तिखट आणि थोडं हात मोकळं सोडून तेल आणि साध्या नंतर सुलेमानी विचारत असतील तर मुस्लिम लोकांमधील कोळीकोड स्टाईल, आणि प्रचंड सात्विक असेल तर खास त्रावणकोर ब्राह्मण किंवा नायर स्टाईल आणि मास्यांचा घमघमाट सुटलेलं गोबी मन्चुरियन आणि केरला परोट्टा असेल (चुकूनही पराठा समजु नका) तर खास ओल्ड एर्नाकुलम मधील ख्रिस्ती स्टाईल हे फॉर्म्युला आता फिट्ट बसले आहेत इतके की मी घमघमाटावरून जिल्हा ओळखायला लागलोय.
बेंगळुरूतील EC मधील साई विश्राम हॉटेल मधला king size ब्रेकफास्ट
मागच्या आठवड्यात फ्लॅटमेटला इकडे वाळवंटात एका केरळी हॉटेलात घेऊन गेलो. युपीचा असुन सुद्धा मोठ्या हिमतीने त्याने साध्या ऑर्डर केला. भाताचे दोन घास खाऊन त्याने फुलके बोलविले आणि ह्या आदिमानवाला अवियल आणि सांबर सोबत पोळी खातांना बघुन मनात विचार आला की सूंदरशी भरजरी साडी नेसलेली लावण्यवती अनुष्का शेट्टी समोर असतांना काही लोकांना मक्ख कतरिना का आवडत असावी?? त्यानंतर त्याला विचारलं कसं होतं जेवण आवडलं का?? तर म्हणतो कसा "नाही होतं बरं पण खूपच नारळ येत होतं दाताखाली 😂🙏🏻

साई विश्राम मधील नॉर्थ इंडियन थाळी,
मी चाखुन बघितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दक्षिण भारतीय आणि काही उत्तर भारतीय थाळी फोटोत देतोय विथ कॅप्शन ह्यातील तुम्ही किती खाल्ल्या आहेत ते जरा आठवा. आणि हे बघुन जेवले असाल तरी भूक लागली तर येत्या २४ ऑगस्टला थिरु ओणम आहे, ज्यांना जाणं शक्य असेल त्यांनी सुंदर केरळी साडीतल्या नल्ल कुट्टी, नाजुक पुक्कलम, आणि अर्थातच चविष्ट साध्या एन्जॉय करायला ह्या सुमारास काढाच एखादी केरळची ट्रिप. अन्नपूर्णा सुखी भव 🙏🏻🙏🏻
फाईव्ह स्टार हॉटेलमधले कांदे भजे (but not worth) साई विश्राम हॉटेल, बंगळुरू

#खाद्यभ्रमंती
🖋 प्रसाद देशपांडे

No comments:

Post a Comment

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels