Menu

वृंदा ताई टिळक यांचा लेख... .कानदे पोहे … …-Kaande Pohe Reciepe


वृंदा ताई टिळक यांचा लेख...
.का न दे पोहे … …🚫💁🏻‍♂🏃‍♂🌾



मंगलगिरी नगरीमध्ये हळूहळू नगरवासियांची हालचाल सुरु होत होती. सूर्योदयापूर्वीच्या मंगल प्रहरी सारे वातावरण प्रसन्न होते.
राजप्रासादाच्या सौधावर युवराज मंगलसेन आपल्या सहाध्यायांसह तलवारबाजीचा सराव करीत होते.कधी तलवारीचे खणखणाट ऐकू येत होते तर कधी ढालीवर तलवार आपटल्याने तो नाद गुंजत होता. अपुऱ्या प्रकाशातही लढण्याचा सराव हवा म्हणून गेले काही दिवस त्यांचा सराव सूर्योदयापूर्वी प्रहरभर सुरु व्हायचा . सूर्योदयाबरोबर सराव पूर्ण करून युवराज आपल्या कक्षात जात असत.
सूर्याचे पहिले किरण राजप्रासादाच्या सुवर्णकळसावर झळकले आणि सराव थांबवून युवराज लगबगीने कठडयाजवळ उभे राहून, प्रासादासमोरून जाणाऱ्या मार्गाकडे उत्सुकतेने पाहू लागले. गेले पंधरा दिवस त्यांची हि लगबग सहदेवाच्या ध्यानात आली होती पण ती कशासाठी हे मात्र त्याला कळले नव्हते.
युवराजांशी काही बोलायच्या निमित्ताने तो देखील कठडयाजवळ गेला आणि मग त्या लगबगीचे कारण त्याच्या लक्षात आले. प्रासादासमोरून जाणारा मार्ग सूर्यमंदिरावरून पुढे जात मनकर्णिका नदीच्या तिरी विसावत होता. सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबरच अमात्यकन्या कांतीदेवी आपल्या सख्यांसह सूर्योपासनेसाठी नदीकिनारी जात असत. सूर्याला अर्घ्य देऊन ,मग मंदिरात सूर्यदेवतेचे दर्शन घेऊन परत नदीतीरावर येऊन आपल्या सख्यांसह सूर्यनमस्कारांचे अनुष्ठान त्या करत असत.
अमात्यकन्या कांतीदेवी जितक्या सुंदर तितक्याच चतुर हि होत्या. गेल्या वसंतोत्सवाच्या त्या विजेत्या ठरल्या होत्या, कारण शक्ती युक्ती ह्याबरोबरच सौंदर्य व कला ह्यात त्यांचा हात धरणारी एकही युवती मंगलगिरीत नव्हती.
युवराज मंगलसेन महाराजांचे हृदयदेखील अमात्य कन्येने जिंकले होते. युवराज मंगलसेन अतिशय उमदे ,रुबाबदार आणि शूर होते. आजूबाजूच्या अनेक राज्यांत त्यांच्या शौर्याची ख्याती होती. युद्धाची त्यांना अजिबात भीती वाटायची नाही पण कांतीदेवीपाशी आपल्या हृदयाची स्थिती उघड करून , प्रेमयाचना करण्याची त्यांना भीती वाटत होती. आज मात्र त्यांनी ठरवले होते, काही झाले तरी कांतीदेवींना आपल्या मनातील गोष्ट सांगायचीच. दिवसही चांगला होता. आगामी वसंतोत्सवातील गायनाच्या कार्यक्रमाचा सराव अमात्यांच्या प्रासादातच होणार होता.
कांतीदेवी आणि त्यांच्या सख्या सूर्यमंदिरातून जेव्हा पुन्हा नदीतीरावर सूर्यनमस्काराच्या अनुष्ठानासाठी आल्या तेव्हा त्यांच्या नेहमीच्या जागी त्यांना दिसला एक झळाळणारा ताम्रकलश ज्यावर गंधाने मंगलचिन्हे काढली होती. त्यावर आम्रपर्णे आणि श्रीफळ शोभत होते. सखी प्रियंवदा क्रोधीत होऊन म्हणाली,"हे काय आता? हे आपले नित्य अनुष्ठानाचे स्थान आहे हे सर्वाना विदित असताना कोणी इथे का मंगलकलश ठेवायचा?" असे म्हणून ती तो उचलून ठेवू लागली. पण तिच्या हातातून कांतीदेवींनी तो कलश घेतला आणि श्रीफळ बाजूला करून त्यातील जलात त्या काही शोधू लागल्या. त्यात त्यांना सुपारी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, विचारमग्नता आणि लज्जा ह्यांचा संगम होऊन त्या अधिकच सुंदर दिसू लागल्या. पण लगेच स्वतः:ला सावरून त्यांनी तो कलश जवळच्या अक्षयवटाच्या पारावर ठेवून दिला आणि मग सख्यांबरोबर आपले सूर्यनमस्काराचे अनुष्ठान पार पडले.
तिथून निघताना त्यांनी एक आगळीच गोष्ट केली ,ती म्हणजे त्या कलशाशेजारी आपल्या पूजेच्या तबकातील काही अक्षता ठेवल्या आणि गंधाने उखळ काढले व त्याच्या समोर सूर्य काढून त्यापुढे वजा दोन असे चिन्हदेखील काढले.
सखी प्रियंवदेने हि कोणती रेखाकृती असे विचारले तेव्हा काहीच उत्तर न देता त्यांनी स्मित केले व तिथून निघाल्या.
सूर्यमंदिरातून दर्शन घेऊन झाल्यावर युवराज मंगलसेन त्वरेने अक्षयवटाच्या पाराजवळ आले. तिथे कलश पाहून प्रसन्न झाले. पण कांतीदेवींनी काढलेली रेखाकृती पाहिल्यावर विचारमग्न झाले. त्यांचा चेहरा उत्कंठेने भारून गेला.
सहदेवाने हे काय असे विचारताच,"धीर धर. लवकरच उलगडा होईल "असेही ते म्हणाले.
नऊ वाजल्याची सूचना मंजुळ आवाजात समय दर्शिकेने देताच वसंतोत्सवाच्या गायन कार्यक्रमाच्या तयारीसाठी काही गायक अमात्य प्रासादात जमले. वेगवेगळ्या गीतांचा विचार होऊन कार्यक्रमात कोणते गीत समाविष्ट होईल ते ठरू लागले. आज अजूनपर्यंत कांतीदेवी मात्र सराव स्थानी आल्या नव्हत्या.
दहा वाजत आले. आता युवराजांच्या चेहऱ्यावर तणाव अगदी स्पष्ट दिसू लागला. गायनात पारंगत असलेल्या युवराजांना गीते निवडीचे काम एवढे का अवघड वाटते आहे,हे सहदेवाच्या लक्षात येईना.
एवढ्यात युवराज म्हणाले,आम्ही एक नवीन चीज रचली आहे. ती म्हणून दाखवतो . आपणां सर्वाना योग्य वाटली तर कार्यक्रमात घेऊ या.
" देई मज जीवनदान हे प्रिये शुभदे, येई गे ,
का न हो तंव दर्शन अन का न दे पोहे "
ते त्याच त्याच ओळी आळवून म्हणू लागले. सहदेवाला कळेना,”आज युवराजांना झाले तरी काय? नेहमीचे त्यांचे शब्दप्रभुत्व गेले कोठे? गीतात पोहे हा शब्द ? अजबच !!" त्या गीताची चाल मात्र फारच चित्ताकर्षक होती. युवराज उत्तम गायक होते आणि आज तर त्यांचा आवाज अतिशय भावविभोर झाला होता. सगळ्यांना ते गीत फार आवडले.
इतक्यात मुदपाक खान्यातील सेवकांबरोबर स्वत: कांतीदेवी दालनात आल्या. विविध स्वादिष्ट पदार्थांची तबके सेवक तिथे ठेवू लागले. त्यांच्याकडून एक तबक घेऊन, ते मात्र स्वहस्ते कांतीदेवींनी युवराजांसमोर ठेवले. ते होते कांदेपोह्यांचे तबक. . युवराजांचा चेहरा आनंदाने उजळला . त्यांनी गुलाबपुष्प देऊन कांतीदेवींना अभिवादन केले. कांतीदेवींनी सस्मित चेहऱ्याने स्वीकार करत प्रतिसाद दिला.
त्यानंतरच्या घडामोडी फारच त्वरेने घडल्या. मध्यान्हीनंतर चार घटिकांनी प्रत्यक्ष महाराज व महाराणी आपल्या लवाजम्यासह अमात्य प्रासादात गेले व त्यांनी अमात्यांकडे युवराजांसोबत कांतीदेवींच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला . अमात्य अतिशय प्रसन्न झाले. ते महाराजांना म्हणाले," हे तर माझे परमभाग्य ! पण आधी कांतीदेवींची संमती विचारायला हवी." महाराणी स्मितपूर्वक म्हणाल्या, “त्याची चिंता आपण करू नये अमात्य. युवराजांनी त्यांची संमती आधीच घेतली आहे. "
राजप्रासादात चालू असलेल्या विवाहाच्या तयारीच्या धामधुमीत सहदेव आणि युवराजांची निवांत भेट होणे कठीणच झाले होते. पण संधी मिळताच सहदेवाने प्रश्न केलाच,"युवराज,तुम्ही कांतीदेवींची संमती कधी घेतली होती?"
युवराज हसून म्हणाले, कांतीदेवींसारख्या चतुर स्त्रीचे मन जिंकायचे तर मग मार्गदेखील तेवढाच अभिनव हवा होता. तो मला सापडला. मी मंगलकलश तिथे ठेवल्यावर कांतीदेवींनी त्यात सुपारी आहे कि नाही खात्री केली. सुपारीला काही भाषांत कांती म्हणतात , हे अनेक भाषांतून प्रवीण असणाऱ्या कांतीदेवींना माहिती असणारच. ,मंगलच्या हृदयात कांती आहे कि नुसताच मंगलकलश देऊन विवाह प्रस्ताव आहे हे त्यांनी पाहिले आणि मग खात्री होताच उत्तर दिले ते ,मंगलकलश अक्षयवटाच्या पारावर ठेवून. तेव्हाच तो होकार होता पण तो प्रत्यक्षात येणार होता जर का मला सांकेतिक भाषा समजली असती तरच !!. त्यांनी तिथे तांदुळाशेजारी उखळ काढून त्याचे पोहे होताना दाखवले. सूर्य वजा दोन म्हणजे बारा वजा दोन बरोबर दहा वाजता, हे आम्हाला कळले तरच तो होकार प्रत्यक्षात येणार होता. म्हणूनच आम्ही संधी शोधत होतो ते सांगायची , ती संधी मिळेपर्यंत आम्ही अस्वस्थ होतो. प्रत्यक्ष होकार कळणार होता तो कांतीदेवींनी आम्हाला पोहे दिले कि. त्या पोहे घेऊन निघाल्या होत्या पण आमचे ‘का न दे पोहे .. का न दे पोहे “‘असे सारखे ऐकून मुदपाकखान्यातील आचाऱ्याना कांदेपोहे करावे असे वाटले ! चरकसंहितेत तर कांद्याचे महत्व सांगितलेच आहे पण शूरांना कांदा अतिप्रिय. हे तो निष्णात आचारी जाणत असणारच. पण इकडे कांदेपोहे तयार होईपर्यंतचा विलंब आम्हाला असह्य झाला होता आणि त्यामुळेच आमच्या गाण्यातील ताना जास्तच भावविभोर झाल्या होत्या.
शुभमुहूर्तावर युवराज मंगलसेन आणि कांतीदेवींचा विवाह झाला. त्यांच्या परस्परांवरील प्रेमाच्या आणि आनंदी ,सुखी सहजीवनाच्या कथा पुढे अनेक वर्षे लोकांच्या आठवणीत राहिल्या. त्याचीच एक खूण म्हणून आनंदात असताना , प्रेमात असताना , लग्न ठरवताना कांदेपोहे करण्याची पद्धतच बनून गेली.
-वृंदा टिळक .https://vrundatilak.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels